लोहा : (प्रतिनिधी) 23 फेब्रुवारी : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हृदयद्रावक रस्ता अपघात झाला. भरधाव ट्रकने धडक दिल्याने दहावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. भागवत श्याम सुंदर शिंदे (रा. जानापुरी, ता. लोहा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना अचानक झालेल्या या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत शिंदे हे सोमवारी सायंकाळी मोटारसायकलवरून (एमएच 26 सीएस) घरी जात होते. खरबी फाटा ते जानापुरीकडे रस्ता ओलांडत असताना नांदेडकडून लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (सीजी 08 सीएक्स 9272) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की भागवत यांचा जागीच मृत्यू झाला.
भागवत हा दहावीचा विद्यार्थी होता आणि सध्या त्याची बोर्डाची परीक्षा सुरू होती. परीक्षेची तयारी करून भविष्याची स्वप्ने रंगवत असताना या विद्यार्थ्याचा हा भीषण अपघात झाला. हुशार विद्यार्थ्याच्या मृत्यूने जानापुरी गावासह त्याच्या शालेय मित्रांवर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच सोनखेर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून अपघातामुळे वाहतूक पूर्ववत झाली आहे. याप्रकरणी सोनखेर पोलीस अधिक तपास करत आहेत.
![]()



