इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या जोरदार हल्ल्यानंतर आता इराणनेही प्रत्युत्तर म्हणून डझनभर क्षेपणास्त्रे डागली आहेत. वृत्तानुसार, इराणने इस्रायलच्या दिशेने सुमारे 70 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत, त्यानंतर तेल अवीवमध्ये सायरन ऐकू येत आहेत. इस्रायली लष्कर ‘आयडीएफ’नेही याला दुजोरा दिला आहे. इराणकडून इस्रायलच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची ओळख पटली असून, संपूर्ण देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. इस्रायलच्या ज्या शहरांना इराणच्या क्षेपणास्त्रांचा फटका बसला आहे त्या शहरांमध्ये जेरुसलेम, हैफा आणि सैफुल्ला यांचा समावेश आहे. यावेळी जेरुसलेममध्ये सायरनचे आवाज वेगाने ऐकू येत आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर लोकांना बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. इराणने दुसऱ्यांदा क्षेपणास्त्रांचा साठा इस्रायलकडे पाठवला असून इस्रायल आपल्या सर्व क्षमतेने ही इराणी क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात गुंतले आहे, असे मीडिया रिपोर्ट्स सांगत आहेत. इराणच्या लष्कराच्या IRGC ने हल्ल्याची माहिती दिली आणि सांगितले की इस्रायलवर ड्रोन-क्षेपणास्त्र हल्ल्याची पहिली लाट नुकतीच पूर्ण झाली आहे. मात्र, झालेल्या नुकसानीबाबत IRGC ने अद्याप कोणताही दावा केलेला नाही. उत्तर इस्रायलमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे काही माध्यमांनी सांगितले. इस्रायलने आपली क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण यंत्रणा पूर्णपणे सक्रिय केली आहे. इस्रायलनेही देशभरात ‘राष्ट्रव्यापी आणीबाणी’ आणि ‘विशेष आपत्कालीन स्थिती’ घोषित केली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजल्याचे वृत्त आहे.
![]()



