नांदेड : 9 डिसेंबर (वार्ताहर) – एका प्रसिद्ध व्यावसायिकाची 35 लाख रुपयांची रोकड भरलेली बॅग चोरीस गेल्याची गंभीर घटना नांदेड येथील कदीम मोंढा परिसरात आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू केला, तर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, तेल व्यापारी विनायक पारसेवार हे दुकान बंद करून घरी जात असताना अचानक त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. चोरट्यांनी कार मुद्दाम पंक्चर केल्याचा संशय आहे. टायर पंक्चर झाल्याने पारसेवार हे वाहनातून बाहेर येताच दोन मोटारसायकलस्वार चोरट्यांनी संधीचा फायदा घेत वाहनात ठेवलेली रोकड भरलेली बॅग हिसकावून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांच्या विविध पथकांनी तात्काळ धाव घेतली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, नांदेड शहराचे एसडीपीओ रामेश्वर वेंजणे, वजिराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
![]()
