बेटी वाचवा भाजपचा पोकळ नारा, बेटीवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीशी भाजप उभी : झीनत शबरीन
मुंबई : उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी असलेले भाजपचे माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या निर्णयाला महिलांवरील गंभीर गुन्ह्यांबाबत यंत्रणेची उदासीनता असल्याचे सांगत मुंबई युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवली. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली सांताक्रूझ ते चर्चगेट दरम्यान लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी थेट संवाद साधून या प्रकरणातील सरकारची भूमिका समोर आली.
यावेळी झीनत शबरीन म्हणाल्या की, उन्नावसारख्या हृदयद्रावक प्रकरणात पीडितेला न्याय देण्याऐवजी दोषीला दिलासा देणे ही भाजपची मानसिकता दर्शवते. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही केवळ घोषणाच राहिली, तर भाजप बलात्काऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे वास्तव आहे. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारची जबाबदारी अनुकंपा, घटनात्मक आणि न्याय्य असायला हवी, पण इथे सत्तेचा गैरवापर करून अत्याचार करणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. जोपर्यंत पीडितेला पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत युवक काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या जनजागृती मोहिमेत मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी पवन मजिठिया, प्रदेश सरचिटणीस संतोष गुप्ता, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष शिव जतीन यादव, दक्षिण मध्य जिल्हाध्यक्षा प्रज्ञा धौले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकल ट्रेनमधील प्रवासादरम्यान कार्यकर्त्यांनी उन्नाव प्रकरणाची संपूर्ण माहिती प्रवाशांना सांगितली आणि सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
झीनत शबरीन पुढे म्हणाल्या की, भाजप महिला सुरक्षेच्या नावाखाली केवळ जाहिरातबाजी करते, परंतु प्रत्यक्षात अशा जघन्य गुन्ह्यांमध्ये आरोपींच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येते. ही दुटप्पी वृत्ती लोकांसमोर आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. महिलांच्या सन्मानाचे आणि न्यायाचे रक्षण करण्यासाठी अशी जनजागृती मोहीम यापुढील काळातही सुरूच राहणार असून, अत्याचारितांचा आवाज कोणत्याही परिस्थितीत दाबला जाणार नाही, अशी घोषणा मुंबई युवक काँग्रेसने केली.
![]()

