काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारने पॅलेस्टिनी आणि त्यांच्या हितसंबंधांना बगल दिल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पॅलेस्टाईनबाबत भारताच्या दीर्घकालीन धोरणाचा संदर्भ देत पॅलेस्टाईन राज्याला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत असल्याचे सांगितले.
जयराम रमेश यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, इस्रायलने व्यापलेल्या वेस्ट बँकमधून हजारो पॅलेस्टिनींना बेदखल आणि विस्थापित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे, ज्याचा जगभरातून निषेध होत आहे. गाझामधील नागरिकांवर इस्रायलचे क्रूर हल्ले अव्याहतपणे सुरू आहेत. तिकडे इस्रायल आणि अमेरिका इराणवर हवाई हल्ले करण्याची योजना आखत आहेत.
ते म्हणाले की, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले त्यांचे चांगले मित्र नेतान्याहू यांना मिठी मारण्यासाठी पंतप्रधान उद्या इस्रायलला जात आहेत. इस्रायलमधील विरोधक तिथल्या संसदेत मोदींच्या भाषणावर बहिष्कार घालण्याची धमकी देत आहेत. नेतन्याहू इस्रायलमधील न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कसे नष्ट करत आहेत, याचा विरोध विरोधक करत आहेत. पॅलेस्टिनींच्या हितसंबंधांबाबत मोदी सरकार संशयास्पद आणि दांभिक विधाने करत असल्याचा दावा त्यांनी केला.
18 नोव्हेंबर 1988 रोजी पॅलेस्टाईनला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत एक होता, हे मोदी सरकारने त्यांना (पॅलेस्टिनींना) सोडून दिले आहे, असे जयराम रमेश यांचे म्हणणे आहे. वृत्तानुसार, मोदी 25 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या दौऱ्यावर इस्रायलला जाणार आहेत. दरम्यान, ते नेसेटला (इस्त्रायली संसद) संबोधित करणार आहेत. मोदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष इसाक हरझोग यांचीही भेट घेणार आहेत.
![]()
