कॅन्सर डायग्नोसिस व्हॅन – ठाणे जिल्ह्यातील उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे (आफताब शेख)
ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, अल्पावधीतच या मोहिमेला जिल्ह्यातील हजारो नागरिकांपर्यंत पोहोचले आहे. ही मोहीम 3 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्हाधिकारी डॉ.श्री कृष्णा पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कर्करोगाच्या लवकर निदानास प्रोत्साहन देणे, वेळेवर उपचारांबद्दल मार्गदर्शन करणे आणि रोगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा होता, कारण लवकर निदान झाल्यास बरा होण्याची शक्यता वाढते.
या उपक्रमांतर्गत विविध गावांमध्ये फिरणाऱ्या व्हॅनद्वारे नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या चाचण्यांचा समावेश होता. जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांमध्ये निश्चित वेळापत्रकानुसार या चाचण्या घेण्यात आल्या. अल्पावधीतच या सुविधेचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला, यावरून मोहीम यशस्वी झाल्याचे द्योतक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर पारगे यांनी सांगितले.
आकडेवारीनुसार, तोंडाच्या कर्करोगासाठी 2,441 नागरिकांची तपासणी करण्यात आली, तर 3 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 1,492 महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी आणि 1,210 महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. एकूण 5143 नागरिकांची तपासणी करण्यात आली. या नमुन्यांमध्ये 5 तोंडाचा कर्करोग, 34 स्तनाचा कर्करोग आणि 14 गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग संशयित रुग्ण आढळून आला. अशाप्रकारे एकूण 53 जण संशयित म्हणून ओळखले गेले, त्यापैकी 8 नागरिकांचे नमुने पुढील प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठी पाठवण्यात आले आहेत.
या मोहिमेत आशा सेवकांसह तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावोगावी भेट देऊन जनजागृती केली, तर स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींनीही सक्रिय भूमिका बजावली. ग्रामीण महिला आणि सामान्य नागरिकांसाठी स्क्रीनिंग सुविधा उपलब्ध करून देणे, कॅन्सरची भीती आणि गैरसमज कमी करणे, वेळेवर निदान करून उपचार प्रभावी करणे आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे हे या उपक्रमाचे ठळक परिणाम आहेत, ज्यामुळे समाजात सकारात्मक बदलाची क्षमता उजळली आहे.
![]()
