मुंबई : (ताजी बातमी) महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील 8 मच्छीमारांना पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितीश राणे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
मंत्री राणे म्हणाले, “हे पालघरचे मच्छिमार मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले आहेत. ते सध्या पाकिस्तानात आहेत, आणि याची संपूर्ण माहिती भारत सरकारला देण्यात आली आहे. आम्ही मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित असल्याने आमच्याकडेही काही माहिती आहे. याबाबत केंद्र सरकार, गृह मंत्रालय आणि इतर संबंधित विभागांशी संपर्क साधण्यात आला आहे.”
“या समस्येचे सकारात्मक पद्धतीने निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी यावेळी अधिक तपशील देऊ शकत नाही, परंतु मी तुम्हाला खात्री देतो की आमचे हे मच्छिमार लवकरच भारतात परत येतील,” ते पुढे म्हणाले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मच्छिमार समुद्रात मासेमारी करताना चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानच्या प्रादेशिक पाण्यात गेले, जिथे त्यांना पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीने (MSA) ताब्यात घेतले. मच्छिमारांच्या सुरक्षित परतीसाठी सध्या भारत सरकार आणि संबंधित यंत्रणा पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
![]()
