शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी RTE अंतर्गत 25% ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी शाळेच्या नोंदणी कालावधीत वाढ
ठाणे (आफताब शेख)
शिक्षणाचा हक्क (RTE) कायद्यांतर्गत, 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास घटकांतील विद्यार्थ्यांना 25% राखीव जागांवर खाजगी विनाअनुदानित आणि स्वयं-वित्तपोषित शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणी प्रक्रिया शुक्रवार 9 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत संबंधित वेबसाइटद्वारे सुरू होती. तथापि, आरटीई अंतर्गत शाळा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया विहित कालावधीत पुरेशा प्रमाणात पूर्ण होऊ शकली नाही, या कारणास्तव, शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय पुणे यांनी दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार प्रक्रियेचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
त्यानुसार शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीसाठी आता 20 जानेवारी 2026 ते 27 जानेवारी 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली असून सर्व संबंधित विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांना त्यांची ऑनलाइन नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया विहित कालावधीत सक्तीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शाळांची पडताळणी करताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून आरटीई कायद्यानुसार 2026-27 या शैक्षणिक वर्षातील 25% प्रवेश प्रक्रियेत बंद शाळा, अल्पसंख्याक दर्जाच्या शाळा, अनधिकृत शाळा आणि स्थलांतरित शाळांचा समावेश करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नोंदणीच्या वेळी शाळेने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची योग्य निवड करावी आणि कोणतीही खोटी, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती टाकू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
या संदर्भात आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सर्व महापालिकांचे शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी आणि पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना परस्पर समन्वय साधण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीनंतर आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
समाजातील दुर्बल व मागासलेल्या घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण व समान संधी मिळण्यासाठी शासनामार्फत RTE अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे, त्यामुळे सर्व संबंधित शाळा व्यवस्थापनाने ही प्रक्रिया गांभीर्याने घेऊन आवश्यक त्या सर्व कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे बाळासाहेब राके यांनी दिले आहेत.
![]()
