नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे संकट आठव्या दिवशीही कायम असून, सध्या तरी सुटकेची चिन्हे नाहीत. गेल्या आठवडाभरात 4500 हून अधिक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. इंडिगो या संकटाबाबत अनेक दावे करत असले तरी, परिस्थिती अजूनही सामान्य नाही.
दिल्लीच्या IGI विमानतळावर अनेक प्रवासी अजूनही तासन्तास त्यांच्या फ्लाइटची वाट पाहत आहेत. वैमानिकांच्या फ्लाइट ड्युटी आणि नियमांमध्ये बदल झाल्यामुळे हे संकट निर्माण झाले. हैदराबादच्या शमशाबाद विमानतळावरून आज 38 उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
हेही वाचा: ‘इंडिगोच्या संकटाला एअरलाइनचे अंतर्गत मुद्दे जबाबदार’, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांचे राज्यसभेत विधान
यापूर्वी सोमवारी दिल्ली आणि बंगळुरू विमानतळावरून 250 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दरम्यान, लखनौ विमानतळावर इंडिगोची २६ उड्डाणे रद्द करण्यात आली. मात्र, गेल्या चार दिवसांपासून फ्लाइट रद्द होण्याचे प्रमाण कमी होत आहे.
दरम्यान, इंडिगो संकटाच्या संदर्भात विमानतळावरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 10 अधिकाऱ्यांना विविध विमानतळांवर पाठवले आहे. हे अधिकारी पुढील दोन-तीन दिवस तेथे राहतील आणि प्रवाशांच्या मदतीसाठी उचललेल्या पावलांवर लक्ष ठेवतील. त्याचप्रमाणे, आज चेन्नई विमानतळावर आगमन रद्द झालेल्यांची संख्या 42 होती, तर निर्गमन रद्द झालेल्यांची संख्या 39 होती. याशिवाय, हैदराबाद विमानतळावर आज आगमन रद्द झालेल्यांची संख्या 14 होती, तर निर्गमन रद्द झालेल्यांची संख्या 44 होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी उड्डयन मंत्रालय आज सर्व एअरलाइन ऑपरेटर्ससोबत बैठक घेणार आहे. काल राममोहन नायडू यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या संदर्भात आज सर्व विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आढावा बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
दरम्यान, सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी म्हटले आहे की सरकार इंडिगोचे हिवाळी उड्डाण वेळापत्रक कमी करेल आणि त्याचे स्लॉट इतर ऑपरेटरना वाटप केले जातील. इंडिगोचा मार्ग आम्ही कट करू, असे ते म्हणाले. ते सध्या 2,200 उड्डाणे चालवत आहेत, आम्ही त्यांना नक्कीच कमी करू.
![]()
