गाझावरील ताज्या इस्त्रायली बॉम्बस्फोटात 24 मुलांसह किमान 90 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. हे हल्ले अमेरिकेने केलेल्या युद्धविरामाचे स्पष्ट उल्लंघन म्हणून आले. अल जझीराने गाझामधील वैद्यकीय स्त्रोतांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, मध्य गाझामध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली आहे.
अल जझीराच्या वृत्तानुसार, बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी पहाटेपर्यंत इस्रायली विमानांनी गाझामधील विविध भागांवर क्रूर हल्ले केले. एकट्या मध्य गाझामध्ये 42 पॅलेस्टिनी शहीद झाले, ज्यात एकाच कुटुंबातील 18 सदस्यांसह लहान मुले, पालक आणि वृद्ध लोक एकाच हल्ल्यात मारले गेले. उत्तर गाझामध्ये 31 तर दक्षिण भागात 18 जण ठार झाले.
इस्त्रायली ड्रोनने गाझामधील अल-देर अल-बालाह भागातील निर्वासितांच्या शिबिरावर हल्ला केला, ज्यात 5 लोक ठार झाले. नंतर, अल-अक्सा शहीद रुग्णालयातील सूत्रांनी पुष्टी केली की दक्षिणेकडील देर अल-बालाह येथील घरावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात आणखी दोन लोक ठार आणि दोन जखमी झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी राफाहमध्ये एक इस्रायली सैनिक मारला गेल्यावर थेट या हल्ल्यांचे आदेश दिले. इस्रायली न्यूज चॅनल 12 नुसार, नेतन्याहू यांनी हल्ल्यापूर्वी अमेरिकेला या निर्णयाची माहिती दिली. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी दावा केला की ही कृती हमासच्या कथित उल्लंघनाला प्रतिसाद म्हणून होती, परंतु त्यांनी असेही सांगितले की युद्ध पुन्हा सुरू करण्याचा कोणताही हेतू नाही.
![]()
